On Ganesha images

Last year around this time, I curated a list of Ganesha images from museums outside South Asia. On the occasion of Ganesha festival (Ganeshotsav), the images served as a visual history of the development of Ganesha-worship in various parts of Asia.

Here is a sneak into my meanderings on the Ganesha images written up in Marathi. I will be happy to upload another post with English translations! Just let me know in the comments below.

हळेबीडचा “एकदंत” गणपती हे यंदाच्या गणेश उत्सवातील पहिले पुष्प.
उजव्या हातात दंत आणि बाकी हातांत क्रमश: परशु, दंड (? भग्न) आणि सबीज महाळुंगाचे फळ किंवा बुंदीचा लाडू असे दिसते. कंबरपट्टा म्हणून लंबोदराने साक्षात तीन फणी नागच परीधान केला आहे! विविध अलंकारांनी शोभून दिसणारा विनायक तत्कालीन मूर्तीकलेचा मानबिंदु असे म्हणता येईल.

रत्नजडीत आभूषणांनी नटलेली मूर्ती साधारण इ. स. ११००-१२५० च्या दरम्यान घडवली असावी. कर्नाटकातील होयसळ राजवटीचा आणि होयसळ शैलीतील शिल्पांचा हा सुवर्णकाळ.  होयसळ एकदंत गजाननाची मूर्ती सध्या सॅन फ्रान्सिस्को (Asian Art Museum) येथे प्रदर्शनात आहे.

काश्मीरमधील हस्तलिखीतात वेगळ्या रूपातील उत्सवमूर्ती गणेश हे यंदाच्या गणेशोत्सवाचे दुसरे पुष्प.
साधारण १५ ते १८ व्या शतकांत पूजा-अर्चा आणि व्रतवैकल्यावर बरीच हस्तलिखिते लिहिली गेली. त्यात देवांची सुबक चित्रे असत. आजची गणपतीची प्रतिमा अश्याच एका British Museum (London) मधील हस्तलिखितातील आहे.
१८ व्या शतकातील हस्तलिखितात पारंपरिक चित्रकलेत गणपती जन्माची कथा खुणावते. मानवी शरीर आणि त्यावर गजाचे शीर वेगळ्या रंगाने रंगवले आहे. उत्तर भारतातील संगमरवरी स्थापत्य चित्रातील पार्श्वभूमी म्हणून दिसते.
आणि गणेशाचे वाहन म्हणून चक्क वाघांची जोडी! काय बरे असेल त्यामागची कथा?
गणेशाच्या हातात परशु, मोदक, दंत आणि पुस्तक असून, भाळी चंद्रकोर आहे. काश्मीर शैव सिद्धांतातील शिवमूर्तीचे काही पडसाद नाही का जाणवत ?

मध्यप्रदेशातील मूर्तीकला आणि तत्कालीन कलाइतिहास दर्शविणारी आजची गणेशमूर्ती, तिसरे पुष्प.
विक्रम संवत १२२१ (इ .स . ११६४) मध्ये कोणी एका वहदेवाच्या पुत्राने (देणगीदाराचे नाव भग्न) गणेशाची प्रतिमा घडवून घेतली असा शिलालेख ह्या मूर्तीवर कोरलेला आढळतो. त्या शिलालेखाच्या दोन्ही बाजूस कोण बरे दर्शविलेले असेल?

परमार राजवटीच्या काळातील ही मूर्ती कदाचित एखाद्या मंदिरावर बसवलेली असावी. सध्या ही प्रतिमा Norton Simon Museum, कॅलिफोर्निया, येथे प्रदर्शनात आहे.
गणेशाच्या दोन्ही बाजूस मांडीवर बुद्धी आणि रिद्धी आहेत. महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या “सिद्धी” ऐवजी “बुद्धी” ही गणेशाची भार्या असल्याचे शिलालेखात समजते. हा स्थानिक परंपरेतील बदल! 
चतुर्भुज गणपती मध्यप्रदेशातील मूर्तीविज्ञानाप्रमाणे “उत्तमपुरुष” असा दर्शविला आहे. ह्या मूर्तीमध्ये गणेशाचे देवत्व कुटुंबवत्सल रूपाने घेतले असे म्हणता येईल.

चौथे पुष्प १९व्या शतकातील हस्तदंती गणेश मूर्ती!

केवळ ३.५ इंच मूर्तीवर शिल्पकाराने गणेश पुराणातील वर्णनाची प्रतिमा साकार केली आहे. ह्या चतुर्भुज गणेशाचे वैशिष्ठ त्याच्या केशभूषेत आहे. “कुटील जटा ” किंवा कुरळे केस पुराणांमध्ये बुद्धिमत्तेचे लक्षण असल्यामुळे गणेशाची केशरचना अशी आढळते. आणि हे काय,तर गणपतीने चक्क केसाचे तीन भाग करून पाठीवर “त्रिजटा” दिसत आहेत! तीन वेण्या किंवा जटा हे भारतीय मूर्तिशास्त्रात गण किंवा रक्षक यांच्या मूर्तीचे लक्षण आहे. आणि हा तर साक्षात गणपती!

ह्या हस्तीदंती गणपतीची स्थापना कदाचित एखाद्या महिरपीत केली असावी असे बैठकीवरील छिद्रांवरून वाटते. Metropolitan Museum of Art मध्ये आणण्यापूर्वी खाजगी संग्रहात असलेली ही मूर्ती कुठे घडवली गेली असे सांगणे कठीण आहे. अशा हस्तीदंती कलाकृती जगभरातील संग्रहालयांमध्ये असून इ. स. १९६० च्या सुमारास केलेल्या परीक्षणात असा अंदाज बांधला गेला की इ. स. पु. ६०० ते १९व्या शतकापर्यंत तब्बल ५०० टन हस्तीदंत भारतात कलांकृत केले गेले!

गणेशाचे ज्येष्ठा-गौरीशी नाते सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. परंतु सर्व स्त्रियांना मातेसमान मानणाऱ्या गणेशाची गोष्ट “गीत गोविंद” ह्या रचनेत नव्याने पाहता येते. इ. स. १७७५-१७८० मध्ये गीतगोविंदाच्या अनेक हस्तलिखिते चित्रांकृत केली. घडवाल राज्यातील हे गीतगोविंदाचे मुखपृष्ठ.
राजाप्रमाणे स्थानापन्न गणपती पापी इंद्रास उशाप देतानाची घटना चित्रकाराने साकारली आहे. येथे चंद्रकोर, मुकुट आणि मोत्याचे दागिने परीधान केलेला गणपती अस्त्रांशिवाय दाखवला आहे. निशस्त्र असूनही इंद्रासारख्या देवराजासमोर गणपतीची शक्ती अबाधित आहे. परस्त्रीकडे लालसेने पाहिल्यामुळे शापीत इंद्र नतमस्तक झालेला दिसतो. गीतगोविंदात गणपतीचे वर्णन सर्व देवी आणि स्त्रियांचे शील जपण्याच्या अनुषंगाने येते. राधा आणि कृष्णाच्या लीलांवर आधारीत गीतगोविंद काव्यात गणेशाची ज्येष्ठा -गौरीप्रती असलेली श्रद्धा वारंवार नमूद केली आहे.
सर्व विघ्नांचा नाश करणारा गणेश गीतगोविंदात पुनःच्य  गौरीव्रताशी जोडलेला आहे.

सध्या Metropolitan Museum of Art मध्ये संग्रहित ही प्रत वरकरणी अतिसामान्य कथा दर्शविणारी वाटू शकते. परंतु गीतगोविंदासाठी गणेशस्तुतीची पार्श्वभूमी आणि  त्यामागील अनेक कथानके समजून घेतल्यावर अधिक महत्वाची ठरते.

उत्तर भारतातील हस्तलिखितांतील दोन कलाकृती यंदाची पुष्पे सहा आणि सात.
या कलाकृतींमध्ये गणेश शैवपरीवारातील शैशवाच्या रूपात आहे. Victoria and Albert Museum (London) मधील चित्रात एका झाडाच्या सावलीत बसलेले शिव आणि कुटुंब तात्पुरते विश्रांतीसाठी थांबले असावे असे दिसते. यात गणेश शैव ब्राह्मणाच्या स्वरूपात आहे. हातांत ग्रंथ आणि लेखणी असून शरीरावर शैव पद्धतीचे गंध दिसते. Asian Art Museum (San Francisco) येथील चित्रात कैलासावरील दृष्य दिसते. सर्व कुटुंबीय आणि त्यांची पशु वाहने नांदताना दाखवली आहेत. गणेश ह्या चित्रात घरकामात हातभार लावताना दाखवला आहे.
दोन्ही चित्रांतील गणपती शेंद्री रंगात का बरं असावा?
सुमारे १८ व्या शतकातील ही दोन्ही चित्रे वेग-वेगळ्या हस्तलिखितांतील असली, तरी एका शैव परंपरेतील आहेत. गणेशाला शैव दैवत म्हणून प्रस्थापित करण्याचा हाच तो काळ. शैव परिवाराचा भाग असलेला गणेश उत्तरभारत आणि दक्षिण भारतातील कलेत वेगळा भासतो का?

आजचे पुष्प आठवे, तिबेटमधील लाकडी गणेश मूर्ती.
बौद्ध मूर्तीप्रमाणे ही उभी गणेशमूर्ती खास “तोगा” नामक पोशाखात आहे. लाकडावर सोन्याचा मुलामा चढवलेली मूर्ती कदाचित पूजेसाठी असावी. मूर्तीच्या आकारमानाने ही मूर्ती सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता यावी ह्या हेतूने घडवली असावी.
ह्या मूर्तीत गणेश मानवरूपी आहे  – इतका, की त्याचे एकदंत आणि लंबोदर स्वरूप जवळजवळ लुप्त झाले आहे. बुद्धाप्रमाणे एक हात अभयमुद्रेत, तर दुसऱ्या हातात अक्षमाला आहे. ह्या मूर्तीची कलाकुसर पाहून मनात संभ्रम निर्माण होतो की ही मूर्ती घडवण्यापुर्वी कलाकाराने खरा हत्ती पहिला असेल का? दक्षिण आशियातील बहुतांश गणपती इतके सुबक आहेत की गज-शीर अगदी हाहूबेहूब शोभून दिसते!
सुमारे १८००व्या शतकातील ह्या मूर्तीबद्दल तुम्हाला काय वाटते ?

१६व्या शतकातील धातूची गणेश मूर्ती आजचे नववे पुष्प.
कंबोडियाच्या इतिहासात शैलेंद्र राजवंशाचे नाव भारतातून कंबोडियात पोहचलेल्या गाणपत्य आणि शैव परंपरांशी जोडले जाते. कदाचित ही मूर्ती ह्याच काळात घडवली असावी. ह्या मूर्तीमध्ये गजाशी साधर्म्यापेक्षा एखाद्या पर्णाची सोंड केली असावी असे भासते. कंबोडियातील मूर्तिकारास हत्ती माहीत नसावा का?
गणेशाने खास कंबोडियातील पद्धतीचा मुकुट परीधान केला असून दागिन्यांमध्ये केवळ बाजुबंद ठळकपणे दिसत आहेत.
सर्वसामान्यपणे भव्य आकारमान असणाऱ्या मूर्ती कंबोडियात दिसतात. त्याविरुद्ध, केवळ ६ इंच उंच असणारी ही मूर्ती एखाद्या वैयक्तिक देव्हाऱ्यात ठेवली असावी.

पाहताक्षणी नटराजाचे रूप वाटावे अशी नेपाळ आणि चिनजवळची मूर्ती यंदाचे पुष्प दहावे.
ही रक्तगणेशाची मूर्ती बौद्धधर्मात विलीन झालेल्या गणेश रूपाची आहे. हातात वज्र आणि यज्ञपात्र असून बाकी आठ हातात इतर लांछने आहेत. शिवाप्रमाणे तिसरा डोळा आणि अग्नी व्यूहात उभा असणारा गणेश रत्नजडीत धातू मूर्तीच्या स्वरूपात आहे. आणि नटराजाच्या पायाशी असणाऱ्या अपस्मारपुरुषाऐवजी इथे चक्क मुषकच! सुमारे १७व्या शतकात बौद्ध धर्मातील वज्रयान पंथात पुजला जाणारा हा गणेश सध्या लंडनच्या Victoria and Albert Museum मध्ये आहे.
धातुमूर्तीला अर्चनासाठी सोन्याच्या मुलामा चढवण्याची पद्धत बौद्ध तंत्र ग्रंथांमध्ये नमूद केली आहे. त्याला अनुसरून ह्या मूर्तीच्या ठराविक भागांवर सोन्याचे वर्ख चढवलेले दिसते.
दक्षिण आशियातील गणेश मूर्तीचा धावता आढावा कसा वाटला?

Please feel free to use material from this post with proper credit 🙂

  • Durga